विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, असे प्रत्युत्तर प्रसिध्द अभिनेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. Riteish Deshmukh
महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले हाेते. रितेश देशमुख यांनी रवींद्र चव्हाण यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला. भाषणाच्या ओघात त्यांनी, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात शंका नाही, असे विधान केले.
रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. लातूरमध्ये विलासराव देशमुख हे केवळ राजकीय नेते नव्हे, तर जनतेच्या मनात खोलवर रुजलेले नेतृत्व मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात लातूर आणि परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण आजही नागरिक कृतज्ञतेने काढतात. त्यामुळे आठवणी पुसल्या जातील, या विधानाला अनेकांनी लातूरच्या अस्मितेला आव्हान देणारे म्हटले आहे.
लातूर मधील प्रत्येक माणसाच्या जीवनाला आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा स्पर्श झालेला आहे, प्रत्येकाच्या मनावर त्यांची आठवण कोरलेली आहे, त्यामुळे बाहेरच्यांनी कोणीतरी येऊन सांगितल्यामुळे ही आठवण कदापिही पुसली जाणार नाही, याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवायला हवी होती, अशा शब्दांत अमित देशमुख यांनीही चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून जन्मालाच आलेला नाही. अनेक जण अशी इच्छा बाळगून इथे आले, पण स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना नेहमीच त्यांची जागा दाखवली. विलासराव देशमुख यांनी संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केले, असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांवर सत्तेच्या माजात केलेल्या वक्तव्यांचा आरोप केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज सत्तेत असलेले भाजप नेते लातूरमध्ये येऊन बरळतात की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील. पण विलासराव देशमुख आणि लातूरकर यांचं नातं काय आहे, हे त्यांना कधीच कळणार नाही. भाजपवालो, हे लक्षात ठेवा, याचा करारा जवाब मिळेल.
रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. अखेर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्या नावाने काँग्रेस मते मागत आहेत. त्यामुळे मी तसे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
Riteish Deshmukh Hits Back at Ravindra Chavan
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड