बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा दोषमुक्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा मिळाला असून, माझगाव येथील न्यायालयाने बुधवारी त्यांची दोषमुक्तता केली आहे. माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी राणा यांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला. Navneet Rana

या प्रकरणात मात्र नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांच्याविरुद्धची कार्यवाही सुरूच राहणार आहे. न्यायालयाने त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.



नवनीत राणा यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून आपल्या मुलीला निवडणूक लढवण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच जात प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना मिळालेले जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या आधारे मिळवलेले असल्याचे नमूद करत रद्द केले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र, एप्रिल २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र पुन्हा वैध ठरवले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आता माझगाव न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे नवनीत राणा यांना फौजदारी प्रकरणातून दिलासा मिळाला असून, मात्र त्यांच्या वडिलांविरोधातील आरोपांवर पुढील काळात न्यायालयात सविस्तर सुनावणी होणार आहे. या निकालामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जात प्रमाणपत्र प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

Navneet Rana Acquitted in Fake Caste Certificate Case

महत्वाच्या बातम्या