रोहित टिळकांचा काँग्रेसला रामराम; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

विशेष प्रतिनिधी

पुणे : लोकमान्य टिळक यांचे वंशज आणि टिळक घराण्यातील तिसऱ्या राजकीय पिढीचे प्रतिनिधी रोहित टिळक यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये त्यांनी काम केले आहे. Rohit Tilak

रोहित टिळक यांनी यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेश युवक काँग्रेसमध्येही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

दरम्यान, अलीकडेच राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. या संदर्भात त्यांनी सांगितले की, राज्यसभेची निवडणूक लढवण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधीच चर्चा झाली होती आणि त्यांची तयारीही होती. मात्र, या जागेसाठी शरद पवार यांचे नाव पुढे आल्यानंतर अर्ज दाखल करणे योग्य वाटले नाही.

रोहित टिळक यांनी सांगितले की, काही काळापासून त्यांनी काँग्रेसचे सक्रिय काम थांबवले होते. आता पुढे शिवसेनेबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार देण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर रोहित टिळक पक्षापासून काहीसे दूरच राहिल्याची चर्चा होती. तरीही पुणे शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचाही विचार सुरू होता.

गुरुवारी शिवसेनेकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती, अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनीही दिली होती. मात्र अखेरीस त्यांना ती संधी मिळाली नाही. आता त्यांनी अधिकृतपणे शिंदे गटाच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Rohit Tilak Quits Congress, Joins Eknath Shinde’s Shiv Sena

महत्वाच्या बातम्या