विशेष प्रतिनिधी
मुंबई : पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारुमुळे गेल्या ४८ तासांत झालेल्या १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून, आणखी लोकांना अटक होऊ शकते. कोणाचीही गय करू नका असे पोलीस आयुक्तांना सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या ४८ तासांमध्ये १२ जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणावर मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. कोणत्या ठिकाणी हे तयार झाले, हे देखील त्यांनी शोधून काढले आहे. या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांचा यात समावेश असू शकतो. त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. गंभीर असलेल्यांना योग्य उपचार देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आठ लोकांना अटक झाली असून, आणखी काही लोकांना यात अटक होऊ शकते.
ज्या ठिकाणी हे झाले आहे, त्यांच्या पाठीमागे कोण त्यांनाही पोलीस शोधत आहेत. सगळी साखळी शोधून आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे. त्यामुळे कडक कलमे त्यांच्यावर लावण्यात आले आहेत”, असे आदेश पोलिसांना दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, हा मिथेनाईल सारखाच पदार्थ आहे. त्यापासूनच हे तयार करण्यात आले आहे. मी यावर जास्त बोलणं योग्य नाही. पोलीस तुम्हाला यावर अधिक माहिती देतील.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गावठी दारू अत्यंत बेकायदेशीरपणे तयार करण्यात आली होती. दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने यामध्ये तब्बल २१५ लीटर घातक ‘मिथेनॉल’ मिसळले. हे अत्यंत विषारी रसायन मिश्रित करून त्याने ही दारू पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर विक्रीसाठी पाठवली. ही दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना तीव्र विषबाधा झाली आणि एकापाठोपाठ एक अशा १२ जणांना प्राण गमवावे लागले.
Do not spare anyone in the poisonous liquor death case, Chief Minister orders Pune Police Commissioner