विशेष प्रतिनिधी
मुंबई :राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, ५-५ लाख रुपये ऍडव्हान्स दिले आहेत. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ चा खेळ सुरु आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही पळवापळवी सुरु आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी विधान परिषदेतील गटनते सतेज ऊर्फ बंटी पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, मराठवाड्यातील नांदेडसाठी खासदार रविंद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विदर्भातील यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, कोकण विभागातील ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.
MVA reaches consensus on 15 of 17 Legislative Council seats; Congress to contest 8, Shiv Sena 4 and NCP 3