Hadapsar : :विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलिसांवर कारवाई; तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

विशेष प्रतिनिधी

पुणे : हडपसर परिसरातील कथित गावठी व विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणातील त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संजय मोगले, हसिना शिकलगार आणि हसन मुलाणी यांचा समावेश आहे. संजय मोगले हे हडपसर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते, तर हसिना शिकलगार या हडपसर पोलीस चौकी प्रमुख आणि हसन मुलाणी हे गुन्हे शोध पथकात कार्यरत होते.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्यात गावठी व विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३७९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, १२३, १२५, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५(ई), ६८, ८१ आणि ८३ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपींनी विषारी द्रव्य मिसळून अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती व विक्री केल्याचे समोर आले आहे. ही दारू सेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असूनही आरोपींनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित झाल्या असून, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आदेशात नमूद केल्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे.

त्यामुळे मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत तिघांनाही तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.

निलंबन काळात संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता, महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता मिळणार आहे. मात्र या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारल्यास निर्वाह भत्त्याचा हक्क गमवावा लागणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच निलंबन काळात कोणत्याही प्रकारची रजा मंजूर होणार नसून मुख्यालय सोडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज पुणे शहर नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Three Hadapsar police officers suspended over toxic liquor tragedy

महत्वाच्या बातम्या