Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : Baramati राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती नगर परिषदेतील नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरुद्ध एका ४५ वर्षीय विधवा महिलेने गंभीर आरोप करत बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लैंगिक छळ, धमकी, मारहाण, पाठलाग आणि विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.Baramati

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती निधन पावल्यानंतर आरोपीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधीत वारंवार तिच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच अंगाला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.Baramati



महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या राजकीय ओळखीचा धाक दाखवत “मी पुढारी आहे, तुला सुखाने जगू देणार नाही, खोट्या गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी दिली. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

याशिवाय, बारामतीतील काही उद्योजकांकडून पैसे उकळून आणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मागणी पूर्ण न केल्यास फोटो प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीने महिलेचा पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Baramati councillor booked for allegedly harassing widow

महत्वाच्या बातम्या