विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nawab Malik बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १७० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.Nawab Malik
बुशरा मलिक या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पुतणी असून कॅप्टन मलिक यांच्या कन्या आहेत.Nawab Malik
बुशरा मलिक यांच्या रूपाने मुंबई महापालिकेत आतापर्यंत एकूण ४ नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा १, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि एमआयएमच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.Nawab Malik
मिळालेल्या माहितीनुसार, बुशरा मलिक यांचे सदस्यत्व नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणामुळे रद्द झाले आहे, याचा सविस्तर अहवाल जात पडताळणी समितीकडून आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या कागदपत्र पडताळणीची एकूण ८९ प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये तब्बल १९ प्रकरणे ही थेट जात प्रमाणपत्राशी संबंधित असून, आगामी काळात आणखी काही नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या या कारवाईत सर्वाधिक फटका असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाला बसला आहे. गोवंडी आणि मानखुर्द परिसरात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३८ मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका रोशन शेख यांचे सदस्यत्व महापालिकेने रद्द केले आहे. परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २७ एप्रिल २०२६ रोजी त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आले होते. प्रमाणपत्र अवैध ठरताच मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ (१सी) (ए) अंतर्गत २७एप्रिल २०२६ पासूनच त्यांचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले आहे.
यापूर्वी गोवंडीच्याच प्रभाग क्रमांक १३७ मधून निवडून आलेले एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचेही ओबीसी प्रमाणपत्र जिल्हा समितीने अवैध ठरवले होते. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर ऋतू तावडे यांनी शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली होती.
या संपूर्ण कारवाईची सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेल्या धक्क्याने झाली होती. भांडुपमधील ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक १११ मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांना आपले पद गमवावे लागले होते. जात प्रमाणपत्राच्या या कडक पडताळणीमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, प्रलंबित १९ प्रकरणांमध्ये आता कोणाचा नंबर लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.