जर मी चुकीचा असेल तर मला मंदिरासमोरच फासावर द्या, आदेश बांदेकर यांचे आव्हान

विशेष प्रतिनिधी

मुंबई: सिद्धिविनायक मंदिर दानपेटी लूट प्रकरणात जर मी चुकीचा असेल तर मला मंदिरासमोरच फासावर द्या” असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिले आहे Aadesh Bandekar

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोप करत म्हटले होते की महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा श्री सिद्धीविनायकच्या मंदिरात दानपेटी लुटली गेली, तेव्हा कारवाई का करण्यात आली नाही? आघाडीचे सरकार असताना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर कोण होते. तेव्हा दानपेटीवर डल्ला मारला गेला. पुरावे आहेत म्हणून बोलत आहे. सिद्धिविनायकला धोके आणि यांना खोके, असे म्हणत त्यांनी आदेश बांदेकरांचे आणि उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले.



एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपांवर बोलताना आदेश बांदेकरांनी म्हटले की, एकतर मी वारीमध्ये आहे, त्यामुळे याच्याबाबत व्यवस्थित काही पाहिलेले नाही. तरी सुद्धा माझे एवढंच म्हणणे आहे की, माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या तीन वर्षांत मंदिराचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे होता. साडेतीन ते चार वर्षांपूर्वी हाच विषय विधी आणि न्याय विभागाकडे अधिवेशनात आला होता. सिद्धिविनायक मंदिरातील कार्यकारी अधिकारी आणि वित्त अधिकारी यांची नियुक्ती मंत्रालयातून केली जाते. त्यामुळे या काळात कोणताही गैरव्यवहार झाला असेल, तर तो सरकारने जाहीर करायला हवा, असे बांदेकरांनी म्हटले.

तसेच, कोणत्याही बातमीच्या आधारावर काहीतरी आरोप करण्यात अर्थ नाही. जर खरंच काही गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. गेल्या साडेतीन वर्षांत कोण अध्यक्ष होते, हे सर्वांना माहीत आहे. त्या काळात कागदपत्रांमध्ये फेरफार झाला असेल, तर त्याचाही तपास व्हायला हवा. या चौकशीत कोणीही दोषी आढळले, अगदी मी स्वतः जरी दोषी ठरलो, तरी मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या. पण पुरावा नसताना खोटे आरोप करू नका. आमच्या कार्यकाळातील प्रत्येक गोष्ट वेळोवेळी जाहीर केली आहे. विधी आणि न्याय विभागाकडे सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. काही चुकीचे आढळत असेल, तर जरूर कारवाई करा, असे आदेश बांदेकरांनी सांगितले.

तर, उगाच धूर दिसला म्हणून आग लागली, असे समजू नका. व्यवस्थित आणि पारदर्शक कारभार करा. स्वतःचे गैरव्यवहार लपवण्यासाठी इतरांवर आरोप करून लोकांची दिशाभूल करू नका. काही चुकीचे आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करा. माझा सहा वर्षांचा कार्यकाळ होता. त्यातील पहिली तीन वर्षे भारतीय जनता पक्षाचे सदस्यही माझ्यासोबत विश्वस्त म्हणून काम करत होते. त्या काळातील प्रत्येक बैठकीची कागदपत्रे, मंजुऱ्या आणि निर्णय मंत्रालयाकडे आहेत. त्यामध्ये काही फेरफार झाले असतील, तर त्याची माहिती मला नाही. पण माझ्या नावाचे एक जरी चुकीचे व्हाउचर आढळलं, तरी माझ्यावर कारवाई करा, असे आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.

इतकेच नव्हे तर त्यांनी “आजही मी गणपती बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो, इतका स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही केला आहे. त्यामुळे कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करू नयेत, हीच माझी विनंती आहे,” अशी सुद्धा प्रतिक्रिया आदेश बांदेकरांनी दिली आहे.

Aadesh Bandekar throws open challenge

महत्वाच्या बातम्या