छत्रपती संभाजीनगरमध्ये तथाकथित ‘डॉन’ बाबा फरजान यांच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा ; ₹5 कोटींची रोकड, शस्त्रसाठ्यासह मोठी जप्ती

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात ९० च्या दशकातील तथाकथित ‘डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा फरजान यांच्या आलिशान बंगल्यावर शनिवारी पहाटे गुन्हे शाखेने छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक तास ही झडती सुरू होती.

प्राथमिक माहितीनुसार, छापादरम्यान बंगल्यातून सुमारे ₹5 कोटींची रोकड, ₹21 लाखांचे सोने, ₹8 लाखांची चांदी, 4 रायफल, 500 जिवंत काडतुसे, तसेच तलवारी, चाकू आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर रोकड आढळल्याने ती मोजण्यासाठी नोटा मोजण्याची यंत्रे घटनास्थळी मागविण्यात आली होती.



या कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने बंगल्यातील विविध खोल्या, तिजोऱ्या आणि इतर ठिकाणांची सखोल तपासणी केली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा परवाना, रोकडचा स्रोत आणि कागदपत्रांमधील व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर मालमत्ता तसेच अन्य गुन्हेगारी व्यवहारांच्या अनुषंगानेही तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गुन्हे शाखेकडून अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, कारवाईमागील नेमके कारण, जप्तीचा तपशील आणि पुढील तपासाची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली असून, अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Farjan’s luxury bungalow in Chhatrapati Sambhajinagar, seizes 5 crore cash and weapons

महत्वाच्या बातम्या