विशेष प्रतिनिधी
पुणे : BJP पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने (BJP) यंदा उमेदवारी देताना महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देत वेगळा राजकीय संदेश दिला आहे. ‘लाडकी बहीण’ या संकल्पनेची थेट निवडणूक रणांगणात अंमलबजावणी करत भाजपने १६५ पैकी ९१ जागांवर महिला उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. BJP
भाजपने केवळ महिला आरक्षण असलेल्या प्रभागांपुरते महिलांचे प्रतिनिधित्व मर्यादित ठेवलेले नाही. सर्वसाधारण, म्हणजेच पुरुषांसाठी खुल्या असलेल्या प्रभागांमध्येही महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे जागांवर पुरुष उमेदवारांना तिकीट मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा भाजपने अशा नऊ प्रभागांमध्ये महिलांना संधी दिली आहे. महिलांना नेतृत्वाची संधी देण्याचा पक्षाचा हा प्रयत्न ‘लाडकी बहीण योजना’या संकल्पनेचा विस्तार असल्याचे मानले जात आहे.BJP
महापालिका निवडणुकीत महिलांना सर्वाधिक संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. पुणे शहराला शिक्षण, आयटी, उद्योग आणि सामाजिक चळवळींचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही काळाची गरज असल्याचे सांगत भाजपने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांचा प्रशासनातील सहभाग वाढल्यास निर्णयप्रक्रियेत संवेदनशीलता आणि सामाजिक प्रश्नांकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल, अशी भूमिका पक्षनेतृत्वाकडून मांडली जात आहे.
आरक्षण नसलेल्या जागांवर ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामध्ये निवेदिता एकबोटे, संगीता दांगट, अर्चना जगताप, विनया बहुलिकर, कविता वैरागे, वीणा घोष, पल्लवी जावळे, रेश्मा भोसले आणि रंजना टिळेकर यांचा समावेश आहे. या उमेदवारांना सर्वसाधारण प्रभागांमधून संधी देत भाजपने परंपरागत राजकीय चौकट मोडण्याचा प्रयत्न केला आहे.
काही प्रभागांमध्ये महिलांना दिलेल्या संधींचे प्रमाण विशेष लक्षवेधी ठरले आहे. कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४० मध्ये भाजपने चारही गटांमध्ये महिला उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज) येथे पाचपैकी तीन जागांवर महिलांना संधी देण्यात आली आहे. तसेच सहकारनगर–पद्मावती (प्रभाग ३६), जनता वसाहत–हिंगणे खुर्द (प्रभाग २८), रविवार पेठ–नाना पेठ (प्रभाग २३), मुकुंदनगर–सॅलेसबरी पार्क (प्रभाग २१), छत्रपती शिवाजीनगर–मॉडेल कॉलनी (प्रभाग १२), गोखलेनगर–वाकडेवाडी (प्रभाग ७) आणि कळस–धानोरी–लोहेगाव (प्रभाग १) येथे चारपैकी तीन जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Bahin Ladki for BJP in Pune, women get opportunities in 91 out of 165 seats
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड