Chief Minister : काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच नाही, मुख्यमंत्र्यांनी टाेचले स्थानिक नेत्यांचे कान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister  काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही. हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister ) यांनी अकाेट आणि अंबरनाथमधील स्थानिक नेत्यांचे कान टोचले आहेत.



अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजपने एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तेसाठी भाजपने कट्टर विरोधकांसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे.

अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. यामध्ये असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाला सोबत घेतले. अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी पक्षाची मूळ विचारधारा सोडल्याची टीका विरोधकांकडून होत होती.
यावर भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, मी स्पष्ट शब्दात सांगतोय काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि १०० टक्के यावर कारवाई होणार.
अकोटमध्ये स्थापन झालेल्या ‘ अकोट विकास मंच’ची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच झाली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यानंतर ही आघाडी टिकणार की भाजप माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथमध्येही काँग्रेससोबतची युती तोडावी लागण्याची शक्यता आहे.
देशपातळीवर एमआयएम आणि काँग्रेसवर सडकून टीका करणाऱ्या भाजपने अकोट आणि अंबरनाथमध्ये आघाडी केल्याने विरोधकांनी चांगलेच घेरले होते. सत्तेसाठी भाजप तत्त्वे गुंडाळून ठेवत आहे, असा आरोप होत असतानाच, मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट कारवाईचा इशारा देऊन हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP will never have an alliance with Congress and AIMIM, Chief Minister tells local leaders

महत्वाच्या बातम्या