पार्थ पवारांना क्लिनचीट नाहीच, चौकशी सुरूच; अंजली दमानियांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांत झळकल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांचे तीव्र शब्दांत खंडन करत, “पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट मिळालेली नाही. त्यांच्याविरोधातील चौकशी अद्याप सुरूच आहे,” असे स्पष्ट केले. Parth Pawar

दमानिया यांनी माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, संबंधित अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही आणि तो अधिकृतरीत्या जाहीरही करण्यात आलेला नाही. “अहवाल अंतिम नसेल, तर तो माध्यमांपर्यंत पोहोचलाच कसा? या संदर्भातील शेवटची बैठक अजून व्हायची आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



आपल्या दाव्यांना पुष्टी देताना दमानिया यांनी काही कागदपत्रांचे शॉर्ट्स आणि छायाप्रती सादर केल्याचे सांगितले. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या करारनाम्यावर पार्थ पवार यांचे नाव, सही आणि शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला. या कागदपत्रांमुळे चौकशीच्या कक्षेत पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे दमानिया यांनी नमूद केले.

“पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्यामुळे चार्जशीटमध्ये नाव नाही, याचा अर्थ क्लिनचीट मिळाली असा होत नाही,” असे स्पष्ट करत दमानिया यांनी कायदेशीर बाबींचे स्पष्टीकरण दिले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

या प्रकरणातील चौकशी करणाऱ्या खारगे समितीला थेट इशारा देत दमानिया म्हणाल्या, “खारगे समिती पार्थ पवारांना या प्रकरणातून बाहेर काढू शकत नाही. जर असा कोणताही प्रयत्न झाला, तर मी समितीला धारेवर धरीन.” पार्थ पवार कोणत्याही परिस्थितीत या घोटाळ्यातून सुटू शकत नाहीत, असा विश्वास व्यक्त करत, गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, क्लिनचीटच्या चर्चांमुळे काही काळ शांत झालेला पुणे जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अंजली दमानियांच्या या आक्रमक भूमिकेमुळे चौकशीची प्रक्रिया, अहवालाची विश्वासार्हता आणि राजकीय दबाव यावर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Parth Pawar Not Given Clean Chit, Investigation Still Underway: Anjali Damania

महत्वाच्या बातम्या