विशेष प्रतिनिधी
नांदेड : Ashok Chavan माजी मुख्यमंत्री तसेच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्या कट्टर समर्थकांकडूनच करण्यात येत आहे.
चव्हाण यांचे जुने सहकारी व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना अनेक इच्छुकांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा देखील समावेश आहे. मुलाचे तिकीट कापल्याने भानुसिंह रावत यांनी नाराजी व्यक्त करत अशोक चव्हाण यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकाकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु, कुठलेही ठोस कारण न देता ऐनवेळी उमेदवारी नाकारात आमच्यावर अन्याय केल्याचाही आरोप रावत यांनी केला आहे. Ashok Chavan
भानुसिंह रावत हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकीय प्रवासात सक्रिय आहेत. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा रावत यांच्यासह 35-40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गाडीपुरा प्रभागातून ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, सर्वांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले असताना ऐनवेळी अनेकांची उमेदवारी कापल्याने रावत यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एकाच घरातील पती, पत्नी आणि पिता-पुत्राला उमेदवारी दिल्यावरून देखील रावत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अशोक चव्हाण यांचे आणखी एक समर्थक असलेले माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनी देखील भाजपच्या महानगराध्यक्ष यांच्यावर उमेदवारीसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. महिला आघाडीच्या प्रदेश सचिव महादेवी मटपटी यांनी देखील आरोप केला होता. त्यामुळे नांदेड भाजपमध्ये उमेदवारी प्रक्रियेवरून तीव्र नाराजी अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत आहे. आता या सगळ्या आरोपांवर अशोक चव्हाण काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर भानुसिंह रावत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून भानुसिंह रावत यांचा मुलगा अक्षयसिंह रावत निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे भाजपकडून महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे येथे काका-पुतणे अशी लढत पाहायला मिळत आहे.
Rs 50 lakh for candidature! Ashok Chavan’s staunch supporters make allegations
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड