उद्धव ठाकरे कोत्या मनाचे नेते ,भाजपमध्ये प्रवेश करताच संताेष धुरी यांचा हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई :उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत. कार्यकर्त्यांची कदर त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबाेल भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करताना मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आपला पक्ष ठाकरे सेनेसमोर सरेंडर केला असल्याची टीकाही त्यांनी केली. Uddhav Thackeray

राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत दुपारी संतोष धुरी यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना धुरी यांनी स्पष्ट शब्दांत मनसे नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

धुरी म्हणाले, राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष ठाकरे सेनेमध्ये सरेंडर केला आहे. मनसेची स्वतंत्र ओळखच संपवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे नेते आहेत. कार्यकर्त्यांची कदर त्यांच्याकडे नाही, असा घणाघात त्यांनी केला.

संतोष धुरी हे यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 194 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जागावाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे गेल्याने मनसेकडून धुरी यांना उमेदवारी मिळाली नाही. या निर्णयामुळे ते नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून होतीच, मात्र भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी ही नाराजी थेट नेतृत्वावर आरोपांच्या स्वरूपात व्यक्त केली.

मनसेमध्ये कदर झाली नाही अशी खंत व्यक्त करत धुरी यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्याशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करत धुरी यांनी भाजप नेतृत्वाकडून आपल्याला मिळालेल्या सन्मानाची तुलना मनसेतील वागणुकीशी केली. नितेश राणे हे कोकणातील नेते असून ते नेहमी माझ्या संपर्कात होते. काल खास माझ्यासाठी ते सिंधुदुर्गावरून मुंबईत आले, असे सांगत त्यांनी भाजपमधील आपले स्वागत कसे झाले सांगितले.

संतोष धुरी हे अनेक वर्षे दादर परिसरात मनसेसाठी सक्रिय होते. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र पराभव पत्करावा लागला. यंदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे पुन्हा एकदा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मनसेचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र जागावाटपात वॉर्ड 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने ही संधी हुकली. सध्या मनसे-सेना युतीमध्ये संदीप देशपांडे यांनाही डावलले जात असल्याचा दावा धुरी यांनी केला.

Uddhav Thackeray Is a Small-Minded Leader, Santosh Dhuri Launches Attack After Joining BJP

महत्वाच्या बातम्या