SRA flat scam : अजित पवारांच्या कार्यालयात काम करतो’ अशी बतावणी; एसआरए फ्लॅटच्या आमिषाने १२ जणांची ६५ लाखांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : SRA flat scam दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात काम करत असल्याची खोटी बतावणी करून एसआरए योजनेअंतर्गत स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत १२ जणांची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी आरोपी लतिफ शांतवन राजगुरू रा. घाटकोपर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.SRA flat scam

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ताडदेव येथे वास्तव्यास असून त्या एका खासगी रुग्णालयात केअरटेकर म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची आरोपी लतिफ राजगुरू याच्याशी ओळख झाली होती. फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचे समजताच आरोपीने स्वतःला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.SRA flat scam



तसेच, एसआरएतील अपात्र सभासदांच्या २०० हून अधिक फाईली आपल्या ताब्यात असून त्या पात्र करून ताडदेवमधील तुळशीवाडी येथील एसआरए प्रकल्पात स्वस्त दरात फ्लॅट मिळवून देण्याची हमी दिली. प्रत्येकी १५ लाख रुपयांत फ्लॅट मिळणार असल्याचे सांगून तातडीने पैसे भरण्याचा आग्रहही त्याने धरला.

आरोपीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने २० लाख ६४ हजार रुपये दिले. त्याचप्रमाणे तिच्या परिचयातील तिघांनी १५ लाख ५५ हजार रुपये दिले. याशिवाय आणखी आठ जणांकडूनही फ्लॅटच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्यात आली. अशा प्रकारे आरोपीने एकूण १२ जणांकडून सुमारे ६५ लाख रुपये घेतले. मात्र, कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही.

फसवणुकीचा संशय आल्याने संबंधितांनी चौकशी केली असता आरोपीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडितांनी ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी लतिफ राजगुरू याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले असून आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, राजकीय व्यक्तींच्या नावाचा आणि सरकारी योजनांचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा कोणत्याही आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे आणि अधिकृत माहितीची पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Man posing as Ajit Pawar aide dupes 12 people of Rs 65 lakh in SRA flat scam

महत्वाच्या बातम्या