दहा दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ; काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

विशेष प्रतिनिधी

पुणे : सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचवणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. गेल्या दहा दिवसांमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केल्याने नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडी व घोडागाडी आणत अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. “इंधन दरवाढ मागे घ्या”, “सामान्य जनतेची लूट बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर होत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना सरकारने आणखी अडचणीत टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
दरवाढ तातडीने कमी करण्यात आली नाही तर गल्लोगल्ली आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती.

Congress stages bullock cart protest over fuel price hike

महत्वाच्या बातम्या