पश्चिम आशियातील तणावामुळे पुणे विमानतळावरील तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

विशेष प्रतिनिधी

पुणे : पश्चिम आशियात सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम आता पुणे विमानतळावरही दिसून येऊ लागला आहे. मंगळवारी उशिरा रात्री आणि बुधवारी पहाटे नियोजित असलेली तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील काही भागांतील हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि ऑपरेशनल अडचणींमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

रद्द झालेली उड्डाणे

स्पाइसजेट SG 51/52 पुणे–दुबई–पुणे या मार्गावरील उड्डाण रद्द. मंगळवारी रात्री ८.३० वाजता पुण्यावरून सुटणारे आणि बुधवारी पहाटे ४.५५ वाजता येणारे दोन्ही प्रवास रद्द करण्यात आले.

इंडिगो 6E 1484/1483 दुबई–पुणे–दुबई मार्गावरील उड्डाण रद्द. रात्री १०.३० वाजता आगमन आणि १२.३० वाजता प्रस्थान अपेक्षित होते.



एअर इंडिया एक्सप्रेस IX 283/284 अबू धाबी–पुणे–अबू धाबी उड्डाण देखील रद्द. रात्री ८.४० वाजता प्रस्थान आणि पहाटे ४.१५ वाजता आगमन नियोजित होते.
प्रवाशांची धावपळ

उड्डाणे अचानक रद्द झाल्याने अनेक प्रवासी संभ्रमात पडले. काही प्रवासी विमानतळावरच हेल्पलाइनवर संपर्क साधताना दिसून आले. संबंधित विमान कंपन्यांकडून प्रवाशांना संदेश पाठवून पर्यायी व्यवस्था, पुनर्नियोजन किंवा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इतर विमानतळांवरही परिणाम

मध्यपूर्वेतील तणावामुळे भारतातील अन्य विमानतळांवरूनही उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परिस्थिती सामान्य होईपर्यंत उड्डाणांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Three International Flights Cancelled at Pune Airport Due to West Asia Tensions

महत्वाच्या बातम्या