विशेष प्रतिनिधी
पुणे:शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर आता महापालिकेने कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी, परिसरात वाढलेली धूळ, आवाजाचे प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे परिणाम याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात शहरातील विविध आरएमसी प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारीही उपस्थित राहणार असल्याने अनधिकृत किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर थेट कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराच्या उपनगरांमध्ये आणि वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरएमसी प्रकल्प उभारले गेले आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या काँक्रीटच्या पुरवठ्यामुळे या प्रकल्पांचे महत्त्व मोठे असले, तरी अनेक ठिकाणी पर्यावरणीय नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रकल्पांमधून उडणारी सिमेंटची धूळ, रस्त्यावर साचणारा मलबा, वाहतुकीमुळे निर्माण होणारा गोंधळ आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः निवासी भागांच्या जवळ सुरू असलेल्या काही प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि धुळीमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेकडून होणारी ही पाहणी केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्ष तपासणीवर आधारित कारवाईची सुरुवात ठरणार असल्याचे बोलले जात आहे. प्रकल्पांकडे आवश्यक परवानग्या आहेत का, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत आहेत का, सांडपाणी व्यवस्थापनाची योग्य सुविधा आहे का, तसेच धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी, झाकलेली वाहतूक व्यवस्था आणि परिसर स्वच्छतेचे निकष पाळले जात आहेत का, याची सखोल पडताळणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाई, प्रकल्प तात्पुरते बंद करण्याचे आदेश किंवा परवानग्या रद्द करण्यासारखे कठोर निर्णयही घेतले जाऊ शकतात.
दरम्यान, या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. शहरातील मोठ्या विकासकामांसाठी आरएमसी प्रकल्प महत्त्वाचे असले तरी पर्यावरणीय जबाबदारी टाळून विकास करणे शक्य नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून दिला जात आहे.
There will be a thorough investigation into the RMC projects in the city; the Municipal Commissioner will personally inspect them.
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन