नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

लातूर : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. याआधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्यातील वनस्पतिशास्त्राच्या लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली होती.
नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या काही अधिकाऱ्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, तपासात आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास राज्यापुरता मर्यादित नसून देशभर पसरलेल्या मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचे सीबीआयच्या तपासातून स्पष्ट होत आहे.



शिवराज मोटेगावकर हे राज्यभर नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या आरसीसी क्लासेसचे संचालक आहेत. गेल्या आठवड्यात सीबीआयने त्यांच्या विविध क्लासेस केंद्रांवर छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयच्या तपासात मोटेगावकर हे नीट पेपरफुटी करणाऱ्या टोळीचे सक्रिय सदस्य असल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांना अटक केल्यानंतर आता विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तपास यंत्रणा आता मोटेगावकर यांचे याआधी अटक करण्यात आलेले आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्याशी संबंध होते का, याचा तपास करत आहे. हे सर्व आरोपी एका मोठ्या संघटित रॅकेटचा भाग होते का, याचाही शोध सीबीआय घेत आहे.
देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Professor Shivraj Motegaonkar arrested by CBI in NEET paper leak case

महत्वाच्या बातम्या