पुण्यात मध्यरात्री गोळीबार ! जमिनीच्या वादातून शिवसेना जिल्हाध्यक्षाचा राडा

विशेष प्रतिनिधी

पुणे :- पुण्यातील सूस-नांदे रस्त्यावरील एका बांधकाम साईटवर जमिनीच्या वादातून शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब रामदास चांदेरे यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूस-नांदे रोडवरील ओम पॅराडाईज इमारतीसमोरील एका जमिनीच्या मालकी हक्कावरून जागामालक लहुजी माळी आणि आरोपी बाळासाहेब चांदेरे यांच्यात जुना वाद सुरू असल्याचे समोर आले.गुरुवारी २ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास चांदेरे हे त्यांच्या कारमधून या बांधकाम साईटवर आले. तिथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेले राहुल सरकार, मेहबूब शेख आणि नागेश राठोड हे गप्पा मारत बसले होते.चांदेरे यांनी तिथे येत थेट शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.



वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चांदेरे यांनी सुरक्षा रक्षक राहुल सरकार यांच्या कानशिलात लगावली. यावर राहुल यांनीही प्रतिकार करत चांदेरे यांना उलट थापड मारली.स्वतःला मार बसल्याने संतापलेल्या बाळासाहेब चांदेरे यांनी कमरेचे काळे पिस्तूल बाहेर काढले. समोर शस्त्र पाहताच तिन्ही तरुणांनी जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. तरुण पळत असतानाच चांदेरे यांनी पिस्तुलातून गोळी झाडली.तरुणांनी पळत जाऊन जवळच असलेल्या स्मशानभूमी जवळील ओढ्यात आश्रय घेतला आणि तिथून पोलीस नियंत्रण कक्षाला (११२) फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांची कारवाई आणि गुन्हे दाखल

घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचा साथीदार संदेश माने या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चांदेरे यांच्याकडून एक पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Midnight shooting in Pune! Shiv Sena District President creates a ruckus over a land dispute.

महत्वाच्या बातम्या