Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असतानाच आमदार रोहित पवार यांच्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “पक्षाने भविष्यात एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर मी दुसरा पर्याय निवडेन; पण भाजपसोबत जाणार नाही,” असे स्पष्ट वक्तव्य रोहित पवार यांनी एका मुलाखतीत केले आहे.Rohit Pawar

अलीकडेच पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे थेट भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विलिनीकरण होणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पक्षाची भूमिका मांडत “कोणतेही विलिनीकरण होणार नाही” असे जाहीर केले.Rohit Pawar



 

विशेष म्हणजे या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. मात्र, त्यांनी स्वतः या विषयावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. तरीही त्यांच्या उपस्थितीतच वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

दरम्यान, सरकारविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेते अपेक्षेइतके आक्रमक दिसत नसल्याने भाजप आणि एनडीएशी पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना मुलाखतीत थेट प्रश्न विचारण्यात आला होता. “भविष्यात पक्षाने विलिनीकरण करून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय असेल?” असा सवाल त्यांना करण्यात आला.

यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील भविष्यातील समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

रोहित पवार यांच्या विधानानंतर त्यांना “दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेससोबत जाणार का?” असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, त्यांनी यावर थेट उत्तर देणे टाळले. “मी दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही,” एवढेच ते म्हणाले.

राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महाविकास आघाडीतील समन्वय या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या विधानाकडे महत्त्वाच्या राजकीय संकेतांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि भविष्यातील आघाड्यांबाबत आता पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Rohit Pawar rules out BJP alliance, sparks fresh buzz over NCP merger talks

महत्वाच्या बातम्या