विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bandu Jadhav शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्ष सोडण्यामागचं कारण प्रथमच सार्वजनिकपणे स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही वैयक्तिक नाराजी नसल्याचं सांगतानाच, पक्ष संघटनेकडे झालेलं दुर्लक्ष, कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.Bandu Jadhav
सेलू येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले की, शिवसेनेत फूट पडू लागल्यानंतर अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याचं आम्ही पाहत होतो. त्यावेळी आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटून, “तुमची तब्येत ठीक नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र फिरणं शक्य नसेल, तर किमान आदित्य ठाकरे यांना तरी राज्यभर पाठवा. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांना भेटून त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात,” असा सल्ला दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्ष संघटना कमकुवत होत गेली आणि कार्यकर्त्यांशी संवाद तुटत गेला, असा दावा त्यांनी केला.Bandu Jadhav
पक्ष सोडण्यामागे आर्थिक कारण असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “काही जण, विशेषतः संजय राऊत, आम्ही पैसे घेऊन पक्ष सोडल्याचा आरोप करतात. पण पैसेच घ्यायचे असते तर २०२२ मध्येच ते मिळाले नसते का? त्यावेळी आम्ही पक्षासोबत ठामपणे उभे राहिलो होतो. मात्र त्यानंतर संघटना दिवसेंदिवस कमकुवत होत गेली. स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत राहणं आवश्यक असल्याची भावना असल्याने हा निर्णय घ्यावा लागला,” असं जाधव यांनी सांगितलं.
शिवसेना सोडण्याचा निर्णय सहज नव्हता, असं सांगताना ते भावनिकही झाले. “बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या भावना जपणारा वटवृक्ष आहे. तो अधिक सक्षम व्हावा, अशीच आमची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे कठोर निर्णय घ्यावा लागला,” असं त्यांनी म्हटलं.
अलीकडेच शिंदे गटाने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा विद्यमान खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांमध्ये सभा घेऊन पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली होती. तर खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर कठोर शब्दांत हल्लाबोल केला होता. मात्र, या सहा खासदारांपैकी बहुतांश जणांनी आतापर्यंत ठाकरे कुटुंबावर थेट टीका टाळली होती. अशा परिस्थितीत बंडू जाधव यांनी प्रथमच संघटनात्मक कारणांवर खुलेपणाने भाष्य केल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राजकीय बदल झाला असला तरी वारकरी परंपरेशी असलेलं नातं कायम राहणार असल्याचंही बंडू जाधव यांनी स्पष्ट केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेतील संघटनात्मक कार्यपद्धती, स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी सक्रियतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
I Had Advised Uddhav Thackeray to Send Aaditya Across Maharashtra”: Bandu Jadhav Reveals Why He Quit Shiv Sena
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी