विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही, आणि असला तर कोणी बाहेर जाऊन बोलणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावले. Supriya Sule
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटातील खासदार अस्वस्थ असल्याचा दावा चव्हाण यांनी केला हाेता. यावर सुळे म्हणाल्या, पृथ्वीराज चव्हाण आणि माझी भेट काही झाली नाही. त्यांना आमचे कोणते खासदार भेटले आणि ते त्यांना अस्वस्थ वाटले माहिती नाही. आमच्या पक्षाचे 8 ही खासदार एक कुटुंब म्हणून काम करत असतो, आमच्यातील कोणी त्यांना भेटले असे मला वाटत नाही, पण ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांच्या कानावर काही आले असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांच्याकडून याबद्दल माहिती घेतली पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही, आणि असला तर कोणी बाहेर जाऊन बोलणार नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले त्यावेळेपासून माझ्या शपथविधीच्या चर्चा सुरू आहेत. मला आश्चर्य वाटते की गेली 12 वर्षे हीच चर्चा करण्याचा कंटाळा कसा येत नाही. टीव्ही अन् वर्तमानपत्रातच मी या चर्चा वाचते पण हे सूत्र कुठून बातम्या आणतात माहिती नाही. पक्ष विलीनीकरणाची चर्चा कुठेही सुरू नाही. अजित पवारांची ती इच्छा होती, आम्ही एकत्र येणार ते ठरले होते पण आता माझा भाऊ आता गेला आता काही चर्चा नाही. शरद पवार यांच्याशी या संबंधात काही चर्चा झालेली नाही. आमची आणि काँग्रेसची विलीनीकरणासंदर्भात काही चर्चा नाही.
अजित पवार आम्हाला सोडून जेव्हा एनडीएमध्ये गेले त्यावेळी अवघ्या 17 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने त्यांची भेट घेतली होती हे वास्तव आहे. त्यावेळी आम्हाला ते काही गैर वाटले नाही. आम्ही ते सर्व काही सांभाळून घेतले. सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असलाच पाहिजे हे आमचे मत आहे तसे संस्कार यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केले आहेत, असा टाेला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची काही बैठक झाली नाही. शरद पवार हे विधानभवनात गेले त्यावेळी काही आमदारांनी त्यांच्याशी चर्चा करायची असे म्हटल्याने सर्वात जवळ एकनाथ शिंदेंचे कॅबिन होते तिथे शरद पवार गेले आणि आमदारांची चर्चा केली. योगायोगाने ते कॅबिन एकनाथ शिंदे यांचे निघाले. कॅबिनेट सुरू असताना शिंदे खाली आले त्यांनी शरद पवारांशी दोन मिनिटे चर्चा केली आणि पुन्हा ते बैठकीला गेले. याबद्दल मी संजय राऊत यांना फोन करत माहिती दिली. कोणीतरी राऊत यांना चुकीची माहिती दिली त्यामुळे राऊत तसे बोलले असावे.
शरद पवार यांच्या विश्वाससार्हतेवर राऊतांनी प्रश्नचिन्ह का उभे केले यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते संजय राऊत हेच सांगू शकतात. कालची भेट ही बातमी करण्यासारखी सुद्धा नव्हती. पण मोठी बातमी झाली त्यातून संजय राऊत यांचा काही गैरसमज झाले असतील ते दुखावले गेले असतील. जेव्हा त्यांना वास्तव कळाले तेव्हा दुखावण्याचा प्रश्नच नाही.