कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणायला लागले आहेत. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा असा जाेरदार हल्लाबाेल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वाे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जाेरदार निशाणा साधला. ते म्हणाले,.हनुमानाने मशालीने लंका जाळली, असा एकाने शोध लावला आहे. त्यांच्या पक्षाची निशाणी लायटर असती तर? तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली. त्यामुळे ते काय बोलतील याचा काही नेम नाही. जो राम का नही, वो किसी काम का नही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकले?

एकनाथ शिंदे म्हणाले, 25 वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता असताना काय परिस्थिती होती, हे आपल्याला माहीत आहे. मी खोटं बोलणार नाही. पण रोज बाहेर ऐकतोय, जे विरोधक मुंबईवर किंवा महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने टीका करत आहेत , त्यात तथ्य तर असले पाहिजे. एक उदाहरण सांगतो, 26 जुलै 2005 ला अतिवृष्टीचे दृश्य आठवा. बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेले? सांगा बरं. आता जे लोक बोलत आहेत, त्यांना आठवण करून दिली पाहिजे. आम्ही सत्तेत असो किंवा नसो जनतेच्या सेवेत सदैव असतो. कोल्हापूरचा पुर असेल, सातारा सांगली महाड चिपळूण, या सगळ्यात आम्ही पुढचा मागचा विचार केला नाही.

एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने काही केले नाही, सरकार उदासीन आहे, हे बोलणे योग्य नाही. मी हॉस्पिटलमध्ये होतो, तरी देखील मी कॉलवर होतो. आपापली जबाबदारी सगळेच लोक पार पाडत होते. आम्ही फेसबूकवाले नाही, आम्ही फेस टु फेसवाले आहोत. संकटात आम्ही घरी बसून राहत नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी रक्त सांडले आहे. तिथे महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांना शाल वगैरे दिले. बाळासाहेब असते तर हे करू दिलं असतं का? असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी आणि तिकडे पायऱ्यांवर, मीडियासमोर आणि शिव्याशाप देतात. विरोधक हा गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष असल्याचे पाहायला मिळाले. बहुमत असले आमच्याकडे तरी सुद्धा लोकशाहीत विरोधी पक्षातल्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आहोत. अशी चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. खाेटेनाटे आरोप करण्यात आले.

पावसाचे मोठे संकट आपल्यावर आले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे. परंतु, सुदैवाने एक जुलैपासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सुटकेचा निश्वास सोडला. आता पावसाच्या संदर्भात आपण आढावा घेत आहोत. अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी झाला ही चिंतेची बाब आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे देखील आपले लक्ष आहे. परंतु, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असेल, जनतेच्या सुरक्षेचा असेल, या सगळ्या विषयांवर बोलताना तथ्य बोलणे अपेक्षित होते. परंतु, विरोधासाठी केवळ विरोध करू नये. पावसाचे राजकारण करण्यात आले, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.



एकनाथ शिंदे म्हणाले, या ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या वेदना देणाऱ्याच आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती सहवेदना आहे. गेल्या 25 वर्षात 15 टक्क्यांनी वाढला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. मुंबईत देखील 25 टक्के पाऊस एका आठवड्यात पडला आहे. 6 जुलैला अतिवृष्टी झाली. यात जनजीवन विस्कळीत होणे हे स्वाभाविक आहे. सरकारने या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवले आहे. आपल्या लाडक्या वारकऱ्यांच्या वाटेतील विघ्न दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पंढरपूरमध्ये आपण चोख व्यवस्था केली आहे. तिथे आयसीयूची देखील सुविधा करण्यात आली आहेत. चंद्रभागेच्या पटांगणात देखील आपण नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क हा आपल्या बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हा विश्वास आपण या ठिकाणी बाळगा. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कसे बदल होतात, हे देखील आपल्याला बघावे लागते. सरकारने पायाभूत सुविधा केल्या आहेत.

शरद पवार यांच्या भेटीवर बाेलताना शिंदे म्हणाले, शरद पवार साहेब तिथे काही कामासाठी आले होते. मला समजले की ते माझ्या दालनात बसले आहेत. आता ज्येष्ठ नेता आला आहे तर मी गेलो भेटायला. पण किती मिरची झोंबली? किती पोट दुखी, किती मळमळ? जमाल गोटा पाहिजे इथे. मुख्यमंत्र्यांना माझ्यावर विश्वास आहे. पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, आपली संस्कृती आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. किती खालच्या थरावर जाऊन बोलणार आहात? मी आपल्याला सांगतो देवेंद्रजी आणि आमच्यात कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला, तरी काही होणार नाही.

‘Ram Raksha remembered only after facing consequences’: Eknath Shinde targets Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या